मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुसळधार पाऊस सुरू असल्याने तापी, पुर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नदी काठच्या नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन मुक्ताईनगर पोलीसांनी केले आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष , पोलिस मित्र तसेच पत्रकार बंधू व प्रतिष्ठित नागरिक यांना कळविण्यात येते की, सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून आपल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीत देखील पावसाचा जोर कायम आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास तापी-पूर्णा नदीला पुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लहान, मोठे नाल्यांना मोठा पूर येण्याची शक्यता असून कृपया कोणीही मच्छीमारी करता अगर इतर कारणास्तव नदीपात्रा मध्ये किंवा नाल्यांमध्ये जाऊ नये. एखाद्या पुलावरून किंवा नाल्यांवरुन पाणी वाहत असल्यास कृपया त्या पुलावरून जाणे अथवा त्या पुलावरून गाडी टाकण्याचे धाडस करू नये, आपल्या गावात पाणी शिरल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे तसेच पूरग्रस्तांसाठी आवश्यक ती मदत करावी. अतिवृष्टीमुळे झाडे उन्मळून पडल्यास आपल्या स्तरावर ती बाजूला करून रहदारी सुरळीत करण्यास मदत करावी. विजांचा कडकडाट होत असल्यास एखाद्या घराचा आश्रय घ्यावा. झाडाखाली कोणीही थांबू नये, तसेच धरण परिसरात फिरण्यास जाणे टाळावे. पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बर्याच ठिकाणी धरणाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने नागरिक अडकल्याने पुराच्या पाण्यात वाहुन गेले आहेत. सदरचा मेसेज हा आपल्या गावातील व्हाट्सअप ग्रुप वरती पाठवून जास्तीत जास्त जनजागृती करावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.