जळगाव : प्रतिनिधी
अमरावती येथील एका ३० वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार करीत बळजबरीने तिचा गर्भपात आणल्याप्रकरणी घडवून एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयित आरोपी प्रसाद सुरेंद्र खंडेलवाल याच्यासह त्याच्या कुटुंबातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला अमरावती येथे एका सरकारी कार्यालयात कार्यरत असून, तिचा परिचय डिसेंबर २०२४ मध्ये एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून प्रसाद सुरेंद्र खंडेलवाल (रा. अयोध्यानगर, जळगाव) याच्यासोबत झाला होता. संशयित आरोपीने लग्नाचे आश्वासन देऊन नाशिक आणि जळगाव येथील हॉटेल व मंगल कार्यालयात पीडितेवर तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसेच तिचे आक्षेपार्ह फोटो काढून तिला ब्लॅकमेल केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये एका मंदिरात आरोपी व पीडितेचे लग्न लावून देण्यात आले. त्यानंतर आरोपीच्या आई-वडिलांनी आणि बहिणींनी पीडितेचा छळ सुरू केला. नोव्हेंबर २०२५ मध्ये पीडिता गर्भवती असताना प्रसादने तिला बळजबरीने गर्भपाताची गोळी देऊन तिचा गर्भपात घडवून आणला. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी २०२६ मध्ये पीडिता गर्भवती राहिली असता, आरोपीने तिला बेदम मारहाण केली. पीडितेने अखेर ‘गुलाबी गँग सखी संस्थेच्या संचालिका वैशाली झाल्टे यांच्या मदतीने १० रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.



