रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील आदिवासीबहुल गारखेडा परिसरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गारखेडा येथील उपकेंद्रात परिचारिका व इतर सुविधा नसल्याने आशा सेविकेला प्रसूती करावी लागली. मात्र उपचारासाठी नेत असताना नवजात बाळाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, निमड्या (ता. रावेर) येथील रुक्साना अजित तडवी (२४) यांची ही तिसरी प्रसूती होती. प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्यांना गारखेडा उपकेंद्रात आणण्यात आले. मात्र त्या वेळी तेथे परिचारिका किंवा वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. फक्त आशा सेविका उपलब्ध असल्याने तिनेच अत्यंत कठीण परिस्थितीत प्रसूती केली. प्रसूतीनंतर बाळ रडत नसल्याने आई व नवजात बाळाला तातडीने पाल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथेही वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे दोघांना पुढील उपचारासाठी खाजगी वाहनाने फैजपूर येथे हलविण्यात येत असताना रस्त्यातच नवजात बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
गारखेडा उपकेंद्रात आवश्यक वैद्यकीय कर्मचारी का नव्हते, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे



