चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील जैन मंदिरासमोर असलेल्या मंडप साहित्याच्या गोडाऊनला दि.१० मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या गोडाऊनमध्ये मंडपाचे साहित्य ठेवण्यात आले होते. आगीत परिसरात काही काळ धुराचे लोट पसरल्याने लोकांमध्ये घबराट पसरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गोडाऊनचे ठिकाण पूर्वी भारत गॅस कंपनीच्या गॅस सिलिंडर साठवणासाठी वापरले जात असे. सध्या येथे मंडपाचे विविध साहित्य साठवून ठेवलेले होते. दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आणि परिसरातील नागरिक भीतीने हलक्यास हलकं झाले.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते बंटी शर्मा यांच्या घरासमोरच हे गोडाऊन असल्याने त्यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवत, जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घरातील बोरिंग सुरू करून नळीच्या सहाय्याने पाणी मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग वाढत असल्याचे लक्षात येताच, तेथे उपस्थित असलेले पत्रकार सूर्यकांत कदम यांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या आगीत मंडप साहित्याचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल तपास करत आहेत.



