चाळीसगाव : प्रतिनिधी
नैसर्गिक मृत्यूला अपघात दाखवून तब्बल ५० लाख रुपयांचा विमा लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी, चार पोलिस कर्मचारी आणि मृताचे कुटुंबीय अशा आठ संशयितांना मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सकाळी ही धडक कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंदार करंबळेकर, मेहुणबारे पोलिस ठाण्यातील कर्मचारी महेंद्र पाटील, रवींद्र बत्तीशे, सचिन निकम सुनील निकम यांच्यासह मृताची पत्नी अरुणा जाधव, भाऊ मिथुन जाधव आणि विमा प्रतिनिधी प्रवीण पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मालेगाव येथील राजेंद्र जालंदर जाधव यांचा १९ एप्रिल २०२५ रोजी दहिवद फाट्यावर अपघातात मृत्यू झाल्याची तक्रार मेहुणबारे पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली होती.
कारने धडक दिल्याने त्यांचा चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे दाखविण्यात आले होते. मृताचे वारसदार म्हणून पत्नी अरुणा जाधव यांनी ३ मे २०२५ रोजी खासगी इन्शुरन्स कंपनीकडे ५० लाखांच्या विम्याचा दावा दाखल केला. विमा कंपनीने चौकशी केल्यानंतर तपासात राजेंद्र जाधव यांचा मृत्यू प्रत्यक्षात २३ फेब्रुवारी २०२४ रोजी यकृताच्या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घरातील फोटोवरही हीच मृत्यूची तारीख होती. दरम्यान, आणखी धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या नावावर विविध कंपन्यांकडून सुमारे दहा विमा पॉलिसी काढण्यात आल्याचे आणि त्यावर दावे करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले.



