जळगाव : प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना उलट जळगावातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात सुमारे १५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात २००० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमती घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव सराफा बाजारात शनिवारी सोन्याचा दर (जीएसटीशिवाय) सुमारे १ लाख ६१ हजार रुपये प्रति तोळा होता. मात्र सोमवारी बाजार उघडताच सोन्याचे दर १ लाख ५९ हजार ५०० रुपयांवर आले. त्यामुळे दोन दिवसांतच सुमारे १५०० रुपयांची घसरण नोंदवली गेली. त्याचप्रमाणे चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीचा दर २ लाख ६८ हजार रुपयांवरून २ लाख ६६ हजार रुपये प्रति किलो इतका खाली आला असून दोन दिवसांत सुमारे २००० रुपयांची घसरण झाली आहे.
सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक गुंतवणूकदारांनी क्रूड ऑइलमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढवला आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोने आणि चांदीच्या दरावर दबाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम बाजारातील किमतींवर दिसून येत आहे. दरम्यान, आठवड्याच्या सुरुवातीलाच दर घसरल्यामुळे सोन्या-चांदीची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाल्याचे चित्र जळगाव सराफा बाजारात पाहायला मिळत आहे.



