मुंबई : वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गुलाम” असल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. फडणवीस म्हणाले, “ज्यांचे संपूर्ण आयुष्य एका परिवाराच्या गुलामीत गेले, त्यांनी देशाला सार्वभौम कसे ठेवतात आणि देश चालवतात, हे आम्हाला शिकवू नये.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, पंतप्रधान मोदींनी भारताची ऊर्जा सुरक्षित ठेवली आहे. “आज टॅरिफ वॉर झाला तरी भारत झुकला नाही, वेगवेगळ्या देशांशी टॅरिफ करार करून भारताने मजबुती दाखवली,” असेही फडणवीस यांनी सांगितले.
गडचिरोलीतील लोखंड प्रकरणावरही मुख्यमंत्री आक्रमक झाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गडचिरोलीचे लोखंड परदेशातून पाठवून पुन्हा विकत घेण्याचा आरोप केला होता. यावर फडणवीस म्हणाले, “कोणी लॉजिकली बोलले तर उत्तर दिले पाहिजे, पण ‘बिनडोक’ बोलल्यावर मी देखील बिनडोक ठरेन.”
याशिवाय, फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली, ज्यावर विरोधकांनी ती फसवणूक असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी नाही, तर जिंकल्यानंतर कर्जमाफी केली आहे. जनता आमच्यावर विश्वास ठेवते, विरोधकांनी कितीही आंदोलने केली तरी जनतेने त्यांना स्थान दिलेले नाही.” फडणवीसांच्या या आक्रमक भाषणाने राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, विरोधकांसमोर त्यांची ताकद स्पष्ट झाली आहे.



