जळगाव : प्रतिनिधी
तू इकडे का आला आहेस असे बोलण्याच्या राग आल्याने विक्की ज्ञानेश्वर माळी (वय २१, रा. जानकीनगर) या तरुणासह त्याच्या मामीवर धारदार कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास जानकी नगरात घडली. याप्रकरणी संशयित मिलींद अरविंद चौधरी (रा. ज्ञानदेवनगर,) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जानकी नगरात विक्की माळी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ६ रोजी सायंकाळच्या सुमारास विक्की हा घराजवळ उभा होता, त्यावेळी आनंद चौधरी हा त्यांच्याजवळ आला. विक्की याने त्याला तु कशासाठी आला आहे असे विचारले, त्यावेळी आनंद याने त्याचा मित्र तेजस पवार याला भेटण्यासाठी आला असल्याचे सांगितले. विक्की याने तेजस हा बाहेरगावी गेला असल्याचे सांगितल्यानंतर आनंद याने तु मला ओळखत नाही का असे म्हणत त्याला भावाला बोलावून घेतले.
काही वेळातच आनंद चौधरी याचा भाऊ त्याठिकाणी आला. त्याने विक्की माळी याच्यासोबत वाद घालत दुचाकीला लावलेल्या भाजीपाल्याच्या पिशवीतून कोयता काढीत त्याने विक्कीच्या डोक्यावर वार केला. यावेळी त्याची मामी त्याला वाचविण्यासाठी आली असता, त्यांच्यावर देखील कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. जखमी विक्की माळी याने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित मिलींद अरविंद चौधरी (रा. ज्ञानदेवनगर,) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील हे करीत आहे.



