जळगाव : प्रतिनिधी
पैसे कर्जाने काढून हॉटेल उभे केले, पण मध्येच ते बंद करण्यास सांगत असल्यामुळे मानसिक व आर्थीक त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायीक प्रमोद पुरुषोत्तम पाटील (वय ५६) यांनी हॉटेलमध्येच गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये त्यांनी परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाचा उल्लेख केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद पाटील यांनी परेश पाटील यांच्यासोबत भागीदारीतून हॉटेल आस्वाद सुरू केले होते. मात्र काही कारणांमुळे हे हॉटेल मागील काही दिवसांपासून बंद होते. दरम्यान, संबंधित हॉटेल ज्या शेतजमिनीत सुरू होते ती जमीन परेश सुभाष पाटील व सुभाष यशवंत पाटील यांच्या मालकीची असल्याने त्यांनी अचानक हॉटेल खाली करण्यास सांगितल्याचे समजते. त्याबदल्यात कोणताही मोबदला देण्यास ते तयार नसल्यामुळे प्रमोद पाटील यांना मानसिक त्रास होत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याची माहिती मिळाली आहे. या मानसिक तणावातूनच प्रमोद पुरुषोत्तम पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे.
प्रमोद पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला. त्यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नातेवाईकांनी पाटील यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली. पोलीस ठाण्याच्या प्रभारी सपोनि योगिता नारखेडे यांनी संशयिताला अटक केल्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेवून गेले.



