कोल्हापूर : वृत्तसंस्था
आपल्या केबिनमध्ये बोलावून एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सौरभ जोशी असे आरोपी प्राध्यापकाचे नाव असून त्याच्याविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही शिक्षणासाठी कोल्हापुरात वास्तव्यास आहे. आरोपी प्राध्यापक सौरभ जोशी याने नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. जोशी हा विद्यार्थिनीला वारंवार फोन व मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत असे. त्यानंतर केबिनमध्ये तिच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार विद्यार्थिनीने केली आहे.
तक्रारीनुसार, आरोपी प्राध्यापकाने यापूर्वीही अनेक विद्यार्थिनींना अशाच प्रकारे त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तो वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींशी अपमानास्पद भाषेत बोलत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सततच्या छळाला कंटाळून संबंधित विद्यार्थिनीने अखेर गुरुवारी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सौरभ जोशी याच्याविरोधात विनयभंग, लैंगिक छळ तसेच पाठलाग (स्टॉकिंग) यांसारख्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर संबंधित महाविद्यालय प्रशासनानेही तातडीने विश्वस्त मंडळाची बैठक घेतली. या बैठकीत आरोपी प्राध्यापक सौरभ जोशी याला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींना कोणतीही भीती न बाळगता अशा प्रकारच्या घटनांविरोधात पुढे येऊन तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.



