जळगाव : प्रतिनिधी
लहान भावासोबत झालेल्या भांडणावरुन अभिषेक बच्चन बागडे (वय २५, रा. मच्छीबाजार, सुप्रिम कॉलनी) याच्यावर पूनम साळुंखे याने कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. ६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सुप्रिम कॉलनीतील नवनाथ चौकात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रिम कॉलनीतील मच्छी बाजारात राहणारे रिक्षा चालक अभिषेक बागडे यांचा लहान भाऊ सोमेन बागडे यांच्यासोबत भांडण झाले. याच भांडणाच्या कारणावरुन शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास संशयित पुनम साळुंखे आणि शिवा जाधव यांनी अभिषेक बागडे यांच्यासह त्यांची आई व बहिणीला शिवीगाळ करीत मारहाण केली. या भांडणात पुनम साळुंखे याने त्याच्या हातातील धारदार कोयता अभिषेकच्या हातावर मारुन गंभीर जखमी केले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना पंकज पाटील हे करीत आहे.



