जळगाव : प्रतिनिधी
दुकानावरील कामगाराला बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर असलेली पाण्याची टाकीची सफाई करण्यासाठी पाठविले. साफसफाई करतांना पाय घसरुन पडल्याने विठ्ठल ढोमण चौधरी (वय ४२, रा. पिंप्री, ता. धरणगाव) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास नयनतारा गेस्ट हाऊसच्या बाजूला असलेल्या मनोहर व्हिला बंगल्यात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील विठ्ठल चौधरी हे शहरातील एका नामांकीत कापड दुकानात कामाला होते. दि. ६ रोजी दुकान मालकाने त्यांना नयनतारा रेस्ट हाऊस शेजारी असलेला मनोहर व्हिला या बंगल्याची साफसफाई करण्यासाठी पाठविले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पाणी टाकीची साफसफाई करत असतांना विठ्ठल चौधरी यांचा तोल गेला, आणि ते दुसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळले. त्यांच्या डोक्याता गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लक्षात येताच जखमी विठ्ठल चौधरी यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विठ्ठल चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून कापड दुकानात काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व एक मुलगा परिवार आहे. घरातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



