लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शिवसेनेच्या ४० आमदारांचे बंड घडवून आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिवसेनेचे राज्यातील १८ पैकी १२ खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून जोरदार हालचाली सुरु असताना उद्धव ठाकरे गटही आक्रमक झाला आहे. ठाकरे गट शिवसेना आमचीच असल्याचा दावा करणार आहेत.
उद्धव ठाकरे आणि शिंदे गाटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील वाद महाराष्ट्रातून दिल्लीत पोहचला आहे. जे विधानसभेत झाले तेच आता संसदेत होणार आहे. शिवसेना आमचीचच असल्याचे पत्र ठाकरे गटातील खासदार लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. आगामी निवडणुकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं म्हणून शिंदे गटाची धावपळ सुरू झाली.
ठाकरे गटाचे विनायक राऊत हे पक्षाचे लोकसभेतील नेते असून राजन विचारे हे प्रतोद आहेत. त्यांच्या जागी राहुल शेवाळेंची गटनेतेपदी, तर भावना गवळी यांची प्रतोदपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. खासदारांनी वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गटास कोर्टाचा दरवाजा ठोठवावा लागेल.शिवसेनेचे 12 खासदार उद्या काय निर्णय घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या खासदारांना केंद्रात मंत्रीपद देखील मिळणार का याकडे ही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.