नागपूर : वृत्तसंस्था
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील ग्रीन एनर्जीशी संबंधित कार्यक्रमात पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली आणि स्पष्ट शब्दांत उपस्थितांना इशारा दिला. इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी आपल्या खास शैलीत लॉबीवादावर निशाणा साधत म्हणाले, “मैं डंडा लेके बैठा हूँ, मुझे मैनेज करने वाला पैदा नहीं हुआ”, ज्यावर उपस्थितांनी जोरदार हसले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
गडकरी यांनी या भाषणात देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, भारताला भविष्यात मजबूत आणि स्वावलंबी बनवायचे असेल तर पर्यायी ऊर्जेवर भर देणे आवश्यक आहे. “काही वर्षांपूर्वी जेव्हा मी जैवइंधन, इथेनॉल किंवा इतर पर्यायी ऊर्जा स्रोतांसाठी योजना मांडल्या होत्या, तेव्हा काही लोकांनी मला वेडा किंवा अवास्तव कल्पना मांडणारा म्हटले. मात्र आज त्या कल्पना वास्तवात उतरल्या आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
ग्रीन एनर्जी क्षेत्रातील उद्योजकांना प्रोत्साहन देताना त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “कामात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता असावी. मी डंडा घेऊन बसलो आहे. मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही. चांगले काम करा, नाहीतर कारवाई होईल,” असे त्यांनी थेट सांगितले.
गडकरी यांनी पेट्रोलियम लॉबीवर थेट आरोप करत म्हटले, “ग्रीन एनर्जीचा विस्तार होत असताना काही शक्तिशाली लॉबी त्याला विरोध करत आहेत. माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम लॉबी उभी आहे. ही लॉबी प्रकल्पांना सहजपणे पुढे जाऊ देणार नाही. मात्र आम्ही या दबावाला घाबरणार नाही.” त्यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रातील उद्योजकांना धैर्याने पुढे जाण्याचे आवाहन केले, “जो संघर्ष टाळतो तो पुढे जाऊ शकत नाही. जो लढाई सोडून पळतो तो संपतो. आवश्यक असल्यास कठीण परिस्थितीतही लढू शकतो आणि यश मिळवू शकतो. आम्ही दुसऱ्याच्या छातीवर चढूनही जिंकू शकतो,” असे ते म्हणाले.
गडकरी यांनी स्वदेशी ऊर्जा स्रोतांवर भर देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जैवइंधन, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि इतर स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांवर भर देणे ही काळाची गरज आहे. भविष्यात भारताने पेट्रोलियमवर अवलंबून राहण्याऐवजी स्वदेशी ऊर्जा स्रोतांवर अधिक भर दिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील या कार्यक्रमात गडकरी यांच्या स्पष्ट आणि थेट वक्तव्यामुळे राजकीय तसेच औद्योगिक वर्तुळात चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील धोरणांबाबत लक्ष वेधले गेले आहे.



