मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून सामना चुरशीचा होण्याची चिन्हे आहेत.
माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
यंदा महाराष्ट्रातील सात जागांसह देशातील दहा राज्यांतील एकूण ३० राज्यसभा जागांसाठी मतदान होणार आहे. येत्या १६ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातून महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गट शरद पवार यांना राजकीय धक्का देण्यासाठी मोठा डाव खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दोन उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पक्षात नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचीही शक्यता आहे. शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारांमध्ये प्राध्यापिका ज्योती वाघमारे, खासदार राहुल शेवाळे, नेते रोहित टिळक आणि नेत्या शायना एन. सी. यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यापैकी ज्योती वाघमारे आणि राहुल शेवाळे यांच्या नावावर अधिक चर्चा रंगली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्ष ने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात माजी मंत्री विनोद तावडे, रामदास आठवले, हिंगोली येथील भाजप नेते रामराव वडकुते आणि नागपूरच्या नेत्या माया ईवनाते यांचा समावेश आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कडून पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी पहिल्या प्राधान्यक्रमाची किमान ३७ मते आवश्यक असतात. सध्या महायुतीकडे एकूण २३२ आमदारांचे समर्थन आहे. त्यात शिवसेना शिंदे गटाकडे सुमारे २० अतिरिक्त मते असून अजित पवार गटाकडे ३ अतिरिक्त मते असल्यामुळे या निवडणुकीतील राजकीय गणित अधिकच रोचक बनले आहे. आता शिवसेना आपले उमेदवार कोण असतील याची घोषणा कधी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक यंदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



