जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील आव्हाणे येथील संजय मणिलाल पाटील (वय ४५) या युवकाचा गिरणा नदीपात्रात बुडून अंत झाल्याची घटना 3 मार्च रोजी दुपारी १:३० वाजता घडली. संजय पाटील हे एका मिस्तरीकडे कामाला होते. ३ मार्च रोजी धरणगाव तालुक्यातील एका गावात काम आटोपून ते पायी आपल्या आव्हाणे गावाकडे परतत होते. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून येताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात बुडाले.
नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धाव घेत संजय यांना बाहेर काढले. संजय पाटील यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयताच्या पश्चात पत्नी, १० वर्षाचा मुलगा आणि वडील असा परिवार आहे. आव्हाणे परिसरात गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उपसा सुरू असतो. या उत्खननामुळे नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी खोल आणि धोकादायक डोह तयार झाले आहेत. याच डोहाचा अंदाज न आल्याने संजय यांचा पाय घसरून मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.



