भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जाम मोहल्ला परिसरातील एका दुकानात सिलिंडरला गळती लागल्यामुळे याचा मोठा भडका उडाला. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पळापळ झाली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र लाखोंचे नुकसान झाले. ही घटना सोमवार, २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जाम मोहल्ला परिसरामध्ये संध्याकाळी पाच वाजेनंतर रोजा इफ्तारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्याचवेळी एका हॉटेलात गॅसला गळती सुरू झाली. त्यामुळे मोठा भडका उडाला व आगीने रौद्ररूप धारण केले. बाजूला असलेल्या हॉटेलला आगीच्या झळा बसल्या. यात मोठे नुकसानही झाले. पालिकेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे विवेक माकोडे यांच्या सहकर्मचाऱ्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. नगराध्यक्ष गायत्री भंगाळे व नगरसेवक सचिन चौधरी यांनीही घटनास्थळी पोहोचून नुकसान झालेल्या व्यावसायिकांची त्वरित नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी दिले. नगरसेवक आसीफ खान इक्बाल खान, जुनेद अशरफ खान तसेच नगरसेवक पिंटू कोठारी यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचत नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले



