धरणगाव, जि. जळगाव : धरणगाव ते एरंडोल दरम्यान हायब्रीड अॅन्युटी पद्धतीअंतर्गत सुरू असलेल्या काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अपूर्ण सर्विस रोड, नियमित पाणीफवारणीचा अभाव आणि कामातील संथ गती यामुळे वाहनचालक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संभाव्य अपघातांची भीती व्यक्त केली जात आहे.
सदर मार्गावरील मुख्य रस्त्याबरोबर उभारण्यात येणारे सर्विस रोड अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत आहेत. काही भागांत सर्विस रोड तयार करण्यात आले असले तरी ते व्यवस्थित समतल न केल्याने आणि नियमित पाणी न मारल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी वाहनचालकांना समोरील रस्ता स्पष्ट दिसत नाही. दुचाकीस्वार, पादचारी आणि व्यापारी वर्गाला याचा अधिक फटका बसत आहे.
या रस्त्याच्या कामाला सुमारे वर्षभरापूर्वी सुरुवात झाली असली तरी अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही. मागील पावसाळ्यात सर्विस रोड नसल्यामुळे अनेक वाहने चिखलात रुतून बसल्याचे प्रकार घडले होते. त्यावेळी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता उन्हाळ्यात धुळीचे लोट उठत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ पुन्हा समोर येत आहेत.
दररोज हजारो नागरिक या मार्गावरून प्रवास करतात. शाळकरी मुले, रुग्णवाहिका, शेतकरी व व्यापारी वर्गासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. धुळीमुळे दृश्यता कमी होत असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. “एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी पुढील मागण्या केल्या आहेत:सर्विस रोड तात्काळ पूर्ण करून समतल करावेत
दररोज नियमित पाणीफवारणी करून धूळ नियंत्रणात ठेवावीकामाची गती वाढवून रस्ता लवकर पूर्ण करावा
आवश्यक तेथे दिशादर्शक फलक व सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात दरम्यान, संबंधित विभाग व ठेकेदाराने या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



