धुळे : वृत्तसंस्था
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या एका ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील दोन पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांसह एकूण सात जण गंभीर जखमी झाले आहेत. बहुतांश जखमी नवापूरला राहणारे पण मूळचे धरणगाव तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,,एमएच ०२ जेपी ८४६२ क्रमांकाची कार धुळ्याकडून सुरतच्या दिशेने वेगाने जात होती. महामार्गावरील एका हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला टीएन ९० डी ८९५२ क्रमांकाचा एक ट्रक उभा होता. कारचा वेग अधिक असल्याने चालकाला उभ्या ट्रकचा अंदाज आला नाही आणि कार थेट ट्रकच्या पाठीमागच्या भागावर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. सर्व सातही जखमींना तातडीने साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तीन वर्षीय शिव भट याला वगळता अन्य सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अपघातात कारमधील जखर्मीची नावे पुढीलप्रमाणे : किरण राजेंद्र भट (वय ४०), सरिता भट (३७), राजश्री भट (६०), शोभा कुळकर्णी (६०), राजेंद्र भट (६५), गौरी भट (७), शिव भट (३ रा.धरणगाव, जि. जळगाव) या सातही जखमींची प्रकृती गंभीर आहे.



