जळगाव : प्रतिनिधी
मित्राच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रम आटोपून माघारी परतणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी दीपक श्रीपतराव सोमवंशी (वय ५८, रा. नाशिक) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले दीलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार (सर्व रा. नाशिक) हे जखमी झाले. ही घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नवीन बायपासवरील भोकणी गावाजवळ घडली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील शिक्षक असलेल्या मित्राचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमासाठी नाशिक येथून दीपक सोमवंशी, दीलीप सोमवंशी, ललित भंगाळे व राजू क्रमांकाच्या कारने नशिराबादला आले होते. सेवानिवृत्त कार्यक्रम आटोपून ते पहाटेच्या सुमारास नशिकला सरदार हे चौघे मित्र (एमएच १५, जीएक्स १८७२) जाण्यासाठी निघाले. नवीन बायपासने जात असतांना बांभोरी पुलाच्या पुढे असलेल्या भोकणी गावाजवळ उभ्या असलेल्या वाहनाला कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, कारचा पुढील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला. तर कारमधील दीपक सोमवंशी यांचा जागीच मृत्यू झाला.
महामार्गावर पहाटेच्या सुमारास कारचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना लागलीच रुग्णवाहिकेतून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तपासणी करीत दीपक सोमवंशी यांना मयत घोषीत केले.
अपघातात ठार झालेले दीपक सोमवंशी हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होवून ते रेल्वे दलात नोकरीस होते. तर ललित भंगाळे हे एका खासगी कंपनीत नोकरीस होते. मित्राच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी ते नशिराबाद येथे आले होते. परंतू माघारी जातांना दुर्देवी काळाने त्यांच्यावर झडप घातली.
पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने निघालेल्या कारने समोर असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यांनी दिलेली धडक इतकी जोरात होती की, कारच्या समोरील भागाचा पुर्णपणे चुराडा झाला होता. कारच्या अपघातात दीलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.



