बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत बुऱ्हाणपूर येथे प्रेमविवाह केल्याप्रकरणी संबंधित तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका गावातील अल्पवयीन मुलीचे गावातीलच दीपक संजय कोळी याच्याशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनीही घरातून पळून जाऊन मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे एका संस्थेत विवाह केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसात हरवल्याची तक्रार नोंदविली होती. त्यानंतर संबंधित तरुण व मुलगी पोलिसांसमोर हजर झाले व त्यांनी विवाह केल्याचा दावा करत त्याबाबतचे कागदपत्रे सादर केली.
या प्रकरणात मुलगी १८ वर्षाखालील असल्याचे समोर आले. मुलीच्या वडिलांनी न्यायालयात धाव घेत तिचे वय १७ वर्षे ११ महिने असल्याचा पुरावा सादर केला. अल्पवयीन मुलीचा विवाह कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य धरला जाऊ शकत नसल्याने न्यायालयाने याची दखल घेत संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्याचे आदेश दिले.



