प्रतिनिधी जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये पूर्वीप्रमाणे ‘नगरसेवक डायरी’ योजना तात्काळ पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सौ. वैशाली अमित पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात त्या उद्या मा. महापौर यांना सविस्तर निवेदन सादर करणार असून प्रशासनातील पारदर्शकता, जबाबदारीची जाणीव आणि वॉर्डनिहाय कामांचा स्पष्ट लेखाजोखा नागरिकांसमोर येण्यासाठी ही योजना अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०१३ मध्ये करण्यात आलेल्या मागणीनुसार २०१३ ते २०१८ या कालावधीत महानगरपालिकेमार्फत ‘नगरसेवक डायरी’ ठेवण्यात येत होती. या डायरीच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात होणाऱ्या फवारणी, गटार साफसफाई, रस्ते स्वच्छता आदी कामांची नोंद संबंधित कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. काम पूर्ण झाल्यानंतर त्या परिसरातील नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन संबंधित नगरसेवकांचीही स्वाक्षरी घेतली जात असे.
या पद्धतीमुळे वॉर्डात प्रत्यक्षात कोणती कामे झाली, याची अधिकृत व पारदर्शक माहिती नागरिक आणि लोकप्रतिनिधींना मिळत होती. परिणामी कामांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढली होती आणि नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास दृढ झाला होता. तसेच अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाच्या कामांवर तत्काळ लक्ष देणे शक्य होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सध्या अशा प्रकारची नोंद पद्धत अस्तित्वात नसल्यामुळे अनेकदा कामे झाली किंवा नाहीत याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याचे सौ. पाटील यांनी स्पष्ट केले. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखण्यासाठी तसेच प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी ‘नगरसेवक डायरी’ योजना पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
यासंदर्भातील निवेदन उद्या मा. महापौर यांच्यासह मा. आयुक्त आणि मा. उपमहापौर यांना माहितीस्तव सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. निवेदनानंतर महापालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेते आणि कोणता निर्णय जाहीर करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.



