पुणे : वृत्तसंस्था
शहरातील एका इमारतीच्या सदनिकेत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाने कारवाई केली. या वेळी एका पीडित अल्पवयीन मुलीची वेश्या व्यवसायातून सुटका करून दोन दलालांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलनाज रफिक शेख (वय 25), इस्माईल इबाहीम खान (वय 32, रा. दोघे भाग्योदयनगर कोंढवा) अशी त्या दलालांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस हवालदार तुषार भिवरकर यांच्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कायद्यासह, बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला एका सोसायटीच्या सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने बनावट ग््रााहक पाठवून खात्री केली. त्यानंतर 21 फेबुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास छापा टाकला असता, हा प्रकार समोर आला. दोन दलाल पीडित मुलीला पैशांचे आमिष आणि धाकदपटशा करून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होते. तसेच तिच्या वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठराविक रक्कम स्वतः घेऊन उदरनिर्वाह करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.



