भिवंडी : वृत्तसंस्था
राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून दाखल मानहानीच्या खटल्यातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते उपस्थित होते. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनामुळे आधीचा जामीन रद्द झाल्याने आज नव्याने जामीन प्रक्रिया पार पडली.
या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी खासगी फिर्याद दाखल केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील सोनाळे येथे झालेल्या प्रचारसभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे. या वक्तव्यामुळे संघटनेची बदनामी झाल्याचा दावा करत भारतीय दंड संहिता कलम ५०० अंतर्गत मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.
खटल्यात फिर्यादीची सरतपासणी व उलटतपासणी पूर्ण झाली असून तपास अधिकारी सायकर यांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांना पूर्वी जामीन देणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर नव्या जामीनदाराची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जामीनदार म्हणून अर्ज केला.
न्यायाधीश पी. एम. कोळसे यांच्या न्यायालयात ही प्रक्रिया पूर्ण झाली. न्यायालयाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी ठरलेल्या तारखेला होणार असून, राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या खटल्याकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.



