अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील श्रीरंग कॉलनीजवळ चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी घडली होती. याप्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अमळनेरातील समर्थ नगरमध्ये राहणारा चंद्रकांत धनराज पाटील (मूळ रा. अमळगाव, वय ४४) याने फिर्याद दिली आहे. दरम्यान, ११ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चंद्रकांत पाटील हे दुचाकी (एमएच १९, सीई ७९४७) ने विजय मारुती मंदिराकडे जात असताना श्रीरंग कॉलनीजवळ समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी (एमएच १९, इए ५३४९) ने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार चंद्रकांत पाटील याचा डावा हात, डावा पाय, चेहरा व कपाळाला गंभीर इजा झाली असून अनेक ठिकाणी मुका मार लागल्याने त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चारचाकी चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करत आहेत.



