छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
वाळूज महानगर परिसरात तिसगाव चौफुली येथे आज एक धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षात गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संशयास्पद हालचालींवरून रिक्षा थांबवली आणि तपासणी करताच मृतदेह सापडला.
मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक घरातील सामानासह गावाकडे जात होते. तिथे पोलिसांना या रिक्षाची हालचाल संशयास्पद वाटली. तपासणी करताच गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळल्याने पोलीसही चक्रावले. तपासात मुलीच्या सावत्र आईने धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “मुलीचे प्रेमसंबंध होते, त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. बदनामी टाळण्यासाठी आणि अंत्यसंस्कारासाठी आम्ही मृतदेह गुपचूप गावाकडे नेत होतो.”
वाळूज एमआयडीसी पोलीस हा प्रकार आत्महत्येचा आहे की घातपात, याचा तपास करत आहेत. संशयित सावत्र आई व वडिलांना ताब्यात घेतले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस अधिकाऱ्यांनी तपासात गती आणली आहे.



