जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहर महानगरपालिका येथे प्रभाग क्रमांक १३ मधील वाढत्या तक्रारींवर अखेर बुधवारी (१८ रोजी) महापौर दालनात विशेष आढावा बैठक पार पडली. महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नगरसेवकांनी आरोग्य, पाणीपुरवठा आणि पथदिवे विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
बैठकीच्या सुरुवातीलाच आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नगरसेविका सुरेखा तायडे यांनी घंटागाडी व्यवस्थापनातील गोंधळ मांडत, “घंटागाडीचे चालक कोण? त्यांचे निश्चित मार्ग कोणते? याची सविस्तर माहिती नगरसेवकांना द्यावी. अनेक भागांत सफाई कामगार नियमित येत नाहीत,” अशी तक्रार केली.
वैशाली पाटील यांनी गटारींच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत, “गटारी साफ केल्या जात नाहीत. काढलेला कचरा तसाच रस्त्यावर पडून राहतो. महिला कामगार कचरा गोळा करतात, पण तो उचलायला कोणी येत नाही,” असा सवाल केला. प्रफुल्ल देवकर यांनी आदर्श नगर परिसरातील अस्वच्छतेकडे लक्ष वेधले.
यावर सहाय्यक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील यांनी प्रभाग १३ मध्ये ७,४१० घरे असून कामगारांची निश्चित यादी असल्याचे सांगितले. कामात कसूर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत असून, येत्या पाच दिवसांत अद्ययावत यादी लोकप्रतिनिधींना देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पाणीपुरवठ्यावरूनही जोरदार चर्चा स्थायी समिती सदस्य नितीन सपके यांनी पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून अधिकाऱ्यांना जाब विचारला. “दौलत नगर, संभाजी नगर, रायसोनी नगर या भागांत नियमित पाणी मिळत नाही. गौरी हाईट्स परिसरात पाण्याचा दाब अत्यंत कमी आहे. नागरिकांच्या तक्रारी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना हव्यात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दौलत नगर हा भाग उंचावर असल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सिंगल कनेक्शन घेतल्यास पाण्याचा दाब सुधारू शकतो, अशी सूचना देण्यात आली.
पथदिव्यांचा अंधार आणि कडक निर्देश
काव्यरत्नावली ते महाबळ रस्ता तसेच लांडोरखोरी उद्यान परिसरात पथदिवे वारंवार बंद राहत असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. उन्हाळा जवळ येत असल्याने पाण्याचे नियोजन तत्काळ करण्याचे आदेश देताना महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत बजावले की, “प्रभागात तक्रारी येता कामा नयेत. स्वच्छता, पाणी आणि पथदिव्यांबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. आठ दिवसांत ठोस सुधारणा दिसली पाहिजे; अन्यथा कारवाईचा विचार केला जाईल. तसेच प्रभागातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक नगरसेवकांना तातडीने देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला प्रभाग १३ चे चारही नगरसेवक – नितीन सपके, सुरेखा तायडे, वैशाली पाटील, प्रफुल्ल देवकर यांच्यासह पाणीपुरवठा, पथदिवे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता पुढील आठ दिवसांत प्रत्यक्षात कितपत सुधारणा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



