पाचोरा : प्रतिनिधी
तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी व मुंबई पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांच्या घरास दि. ७ फेब्रुवारीला मध्यरात्री दोनच्या सुमारास पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात तीनजणांना अटक करण्यात आली आहे.
घटनेच्या वेळी त्यांच्या आई व बहीण घरात झोपलेल्या होत्या. मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावण्यात आल्याने गावात दहशतीचे व भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेने तातडीने समांतर तपास सुरू केला व गणेश पाटील (कळमसरा) यास ताब्यात घेतले. त्याने समाधान निका याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान या प्रकरणाचा सूत्रधार हा फिर्यादी आणि फौजदाराची बहिण किरण उमेशसिंग राऊळ यांचा पती राहुल वसंतराव पाटील (जामनेर) असल्याचे समोर आले. राहुल पाटील व किरण राऊळ यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असून न्यायालयाने राहुल यास दरमहा २० हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यातून सूड उगवण्यासाठी राहुल पाटील याने आरोपींना दोन लाख रुपयांची सुपारी दिली असून एक लाख रुपये आगाऊ दिल्याची माहिती तपासात उघड झाली.
या तपासात आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या नऊ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तसेच सायबर सेलने ही कारवाई केली. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



