धरणगाव गौरव पाटील : – एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून ५० आमदारांनी शिवसेनेपासून वेगळे होत आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपशी युती करून सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील ५ आमदार सामील आहेत. या राजकीय उलथापालथीवर स्थानिक पातळीवर उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि एकनाथराव शिंदे यांचे नेतृत्व मानणारे दोन गट निर्माण झाले आहेत . त्या पार्शवभूमीवर अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती ? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . धरणगाव तालुक्यातही अशीच काहीशी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे . मात्र तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि धरणगाव नागरपालिकेतल्या नगरसेवकांनीही आपले सामूहिक राजीनामे जिल्हा प्रमुखांकडे दिल्याने राजकीय गोटात खळबळ माजणे स्वाभाविक आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही पदाधिकारी राजीनामे देतील अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे . आगामी जिल्हा परिषद, ग्रामपंचायत ,विधानसभा नंतर लोकसभा अशा निवडणुकांवर या सत्ताबदलाचा परिणाम होऊन राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एकीकडे शिंदे गटात सामील झालेल्या जिल्ह्यातील ५ आमदारांवर शिवसेनकडून टीकेची झोड उठत असून तर दुसरीकडे स्थानिक पातळीवरचे नेतृत्वाला प्राधान्य देत गुलाबराव पाटील समर्थक शिवसेनेच्या आपल्या विविध पदांचे राजीनामे देत आहेत . अशा राजकीय पृष्ठभूमीवर शिवसैनिक यांच्यामध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण असून विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. याचे राजकीय परिणाम आगामी काळात सर्वसामान्य जनतेला दिसून येणार आहे. दरम्यानवरिष्ठ पातळीवर शिंदे गटाची भाजपसोबत युती असल्याने स्थानिक पातळीवर भाजप आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी शिंदे गट समर्थक कशा पद्धतीने जुळवून घेतात हे आगामी काळच ठरवेल .