जळगाव : प्रतिनिधी
शहर परिसरात आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तनवीर ऊर्फ तन्या रहीम शेख (वय ३०, रा. गेंदालाल मिल) या तडीपाराला जळगाव शहर पोलिसांनी बुधवार, १० फेब्रुवारी रोजी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून एक धारदार लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील गेंदालाल मिल भागातील साईबाबा मंदिरासमोर ही कारवाई करण्यात आली. कानळदा रोडवर एक तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस कर्मचारी अमोल अशोक ठाकूर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी तनवीर याला उपविभागीय दंडाधिकारी जळगाव विभाग यांनी ७ फेब्रुवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी जळगाव जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आरोपीने शहरात प्रवेश करून दहशत माजवली.



