जळगाव : प्रतिनिधी
कट लागल्याच्या कारणावरुन दुचाकी आणि कार चालक रस्त्यात थांबले होते. त्यामुळे ट्रॉफिक जाम होत असल्याने सोडविण्यासाठी गेलेल्या वाहतुक पोलिसांच्या दारुच्या नशेत असलेले तरुण अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडली. याप्रकरणी संशयित अविनाश दिलीप शरमळे (वय २२) आणि शाईदास भगवान राठोड (वय २०, दोन्ही राहणार रामेश्वर कॉलनी) या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहर वाहतुक शाखेत नियुक्त असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक तुळशीराम बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल आकाश गोसावी हे रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुरली मनोहर हॉटेलसमोर एका पांढऱ्या रंगाच्या कारला मोटारसायकल (एमएच १९, ईएन ५३१७) क्रमांकांची आडवी लावलेली दिसली. यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती आणि त्यामुळे तेथून जाणाऱ्या वाहन धारकांची गर्दी जमून वाहतुक खोळंबली होती. हा प्रकार त्याठिकाणी नियुक्तीस असलेले वाहतुक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून दोन्ही पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी गेले. रस्त्याच्या मधोधम तीन तरुण आपापसात जोरात आरडाओरड करत होते. पोलिसांनी त्यांना विचारणा केली असता, मोटारसायकलस्वाराने सांगितले की कारचा त्याच्या गाडीला कट लागला आहे. पोलिसांनी त्याला शांत राहून गाडी बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने त्या तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
हुज्जत घालणाऱ्या तरुणाने तुम्ही कोण ? मला कारचा कट लागला आहे, माझे व्हिडिओ शूटिंग काढा, असे म्हणत संबंधित तरुण पोलिसांच्या अंगावर धावून गेला. यावेळी पो.कॉ. आकाश गोसावी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संशयित आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी कशीबशी वाहतूक सुरळीत केली, मात्र त्यानंतरही या तरुणांचा गोंधळ सुरूच होता. पोलिसांनी संशयित तरुणाची दुचाकीसह दोघांना शहर वाहतुक शाखेत आणले. तपासादरम्यान अविनाश शरमळे याच्या तोंडाचा उग्र वास येत असल्याने त्याची ‘ब्रेथ अॅनालायझर’ मशीनद्वारे तपासणी केली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित अविनाश दिलीप शरमळे (वय २२) आणि शाईदास भगवान राठोड (वय २०, दोन्ही राहणार रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.



