मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान अपघात प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) तपासाला गती दिली आहे. या तपासात महत्त्वाचा भाग म्हणून त्यांच्या खासगी सचिवांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अजित पवार मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने रवाना झाले होते. मात्र बारामती विमानतळाजवळ धावपट्टीवर विमान कोसळले आणि यात पाच जणांचा मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसल्यामुळे सरकारने सखोल चौकशीचे आदेश दिले.
सीआयडीने अजित पवार यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांची सविस्तर चौकशी चार तासांपेक्षा जास्त वेळ चालवली. चौकशीत बारामती दौऱ्याचे नियोजन, प्रवासाचा आराखडा, विमान प्रवासाची तयारी आणि अपघाताच्या अगोदर झालेल्या चर्चांचा तपशील नोंदवण्यात आला.
सीआयडी तपास तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा इतर संभाव्य कारणे यावर केंद्रित आहे. अपघाताचे मूळ कारण शोधण्यासाठी विमानाचे वेग, उंची, इंजिन तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलट संवाद यासह सर्व तांत्रिक घटक तपासले जात आहेत. तसेच विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून सखोल विश्लेषण केले जाणार आहे. सीआयडीचे अधिकारी राजकीय संशय व सर्व शक्य कारणे तपासात समाविष्ट करत आहेत. तपास तीन टप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात तांत्रिक माहिती गोळा, दुसऱ्या टप्प्यात विमान अवशेषांचे विश्लेषण, आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण निष्कर्ष काढण्याचे नियोजन आहे. राज्यभरातून या तपासाकडे लक्ष लागले असून, अपघाताचे नेमके कारण लवकरच उघड होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



