भुसावळ : प्रतिनिधी
शहरात सट्टा व इतर अवैध धंदे बंद असतानाही बिनधास्तपणे सुरू असलेल्या सट्टा जुगारावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. जामनेर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संकुलात व्यायामशाळेच्या आडोशाला सार्वजनिक जागी सट्टा स्वीकारणाऱ्या एका इसमाला बाजारपेठ पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत श्यामलाल दैलतसिंग बजाज (वय ५६, रा. नानक नगर, सिंधी कॉलनी, भुसावळ) हा सट्टा बंद असतानाही लोकांकडून पैसे स्वीकारून सट्टा जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याच्या कब्जातून २,१३० रुपये रोख रक्कम तसेच सट्टा जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अवैध धंदे २६ जानेवारीपर्यंत पूर्णतः बंद करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली असून सातत्याने कारवाई सुरू आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अवैध धंद्यांविरोधातील मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस कर्मचारी भूषण चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला दि. ५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी व सट्टा, मटका यांसारख्या अवैध धंद्यांमुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त होऊ नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे पोलीस प्रशासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या दहा दिवसांपासून अवैध धंदे बंद असल्याने धंदेचालक व मालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.



