जळगाव : प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा नसल्यामुळे त्याची ओळख पटविण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते. परंतू मयताच्या पायाच्या नखावरील नेलपॉलीश आणि नाकातील सोन्याच्या ‘मुर्ती’ वरुन एलसीबीच्या पथकाला तपासाचा धागा गवसला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत मयताची ओळख पटवली असून तो मृतदेह महिलेचा नसून आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार खैरागड, छत्तीसगड) या तृतीयपंथीयाचा असल्याचे समोर आले आहे. प्रेमसंबंधासाठी तगादा लावल्यामुळे संशयित गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (रा. पहूर, ता. जामनेर) याने खून केल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील पद्मालय वनपरिक्षेत्रात दि. ४ रोजी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहरा व छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून टाकला होता. मृतदेह ज्याठिकाणी मिळून आला तो परिसर घनदाट जंगल असल्यामुळे त्याठिकाणी दूरपर्यंत मानवी वर्दळ नव्हती. तसेच त्या परिसरात मोबाईलला रेंज नसल्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. शुक्रवारी फॉरेन्सीकच्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो अहवाल पोलिसांकडे सादर करण्यात आला. त्यानंतर पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे, ईश्वर पाटील, विनोद पाटील यांचे पथक तयार करीत तपासाकरीता रवाना केले.
पोलिसांनी मयत कोठून आला, कोणासोबत आला, याची माहिती संकलित केली असता संशयिताने तृतीयपंथीयाला पद्मालयाला नेवून गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर पद्मालयाच्या जंगलात घेवून जात त्याठिकाणी मद्य प्राशन केले. रागाच्या भरात तृतीय पंथीच्या डोक्यात प्र-हार करुन त्याचा गळा आवळला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आणि मयताची ओळख पटू नये, या करीता दुचाकीतील पेट्रोल टाकून मृतदेह जाळून टाकल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले.
ज्या स्थितीत मृतदेह मिळून आला होता त्यावरुन पोलिसांनी हा मृतदेह एक दिवस आधीच जाळल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. परंतू फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून तो मृत्यू पाच ते सहा दिवसांपुर्वीच म्हणजेच ३० किंवा ३१ जानेवारीदरम्यान झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांकडून या घटनेचा तपासाला सुरुवात झाली.
पोलिसांना मिळालेल्या भौतिक व तांत्रिक पुरावे या आधारे पोलिसांनी संशयित स्वप्नील उर्फ गोलू पाटील यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मयत तृतीयपंथी आकांक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे याने गोलू उर्फ स्वप्निल पाटील याच्याकडे प्रेमसंबंधासाठी तगादा लावत होता. त्यातून त्यांच्यात वादही झाले होते. त्याला कंटाळून तरुणाने तृतीयपंथीचा खून करीत पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाच्या अंगावरील कपडे काढून जाळून टाकल्याची कबुली संशयिताने पोलिसांना दिली.



