चाळीसगाव : प्रतिनिधी
पोलीस दल किंवा वन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तिघा तरुणांकडून प्रत्येकी दोन लाख रुपये उकळून एकूण सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी हिंगोणे खुर्द (ता. चाळीसगाव) येथील घनशाम कैलास पाटील (वय ३०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. घनशाम पाटील हे मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात. संशयित कुणाल भगवान डांगर (रा. छत्रपती संभाजीनगर, सध्या रा. टाकळी प्र.चा., ता. चाळीसगाव) याने पोलीस दल किंवा वन विभागात नोकरी लावून देऊ शकतो, असा दावा करत घनशाम पाटील, दीपक गोपीचंद चव्हाण व दर्षन्न दिल्लीप चव्हाण यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर चाळीसगावातील गणेश कॉम्प्लेक्समधील देवांश मोबाईल शॉपी तसेच बँक ऑफ इंडिया परिसरात या संदर्भात चर्चा झाली. जून २०२४ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संशयिताने तिघांकडून वेगवेगळ्या टप्प्यांत प्रत्येकी दोन लाख रुपये स्वीकारले. मात्र, दीर्घ कालावधी उलटूनही नोकरी न मिळाल्याने व संशयित वारंवार टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिघांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर घनशाम पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयित कुणाल डांगर याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करीत आहेत. दरम्यान, सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.



