जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात १ फेब्रुवारी रोजी झालेल्या किरकोळ वादातून घडलेल्या मारहाण प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुभम गजानन सपकाळे असे मृत तरुणाचे नाव असून, मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम सपकाळे हा प्रशांत पाटील चौक परिसरातून सार्वजनिक रस्त्याने जात असताना काही युवकांनी त्याला अडवले. कोणतेही ठोस कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील उर्फ बॉण्ड आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून शुभमवर लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती. घटनेनंतर जखमी अवस्थेत शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता शुभमच्या मृत्यूनंतर या गुन्ह्यात कलम १०३ (खून) वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुभमच्या मृत्यूची बातमी समजताच पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्राळा परिसरात तसेच शुभमच्या निवासस्थानी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शुभमचा मृतदेह उद्या, शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान जळगावात आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथके कार्यरत आहेत. या घटनेचा सखोल तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी करीत असून, एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याने शहरात गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.



