मुक्ताईनगर : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील मानपूर येथील पोलिस पाटील मुकेश आनंदा तायडे (वय ३८) यांचा मृतदेह नांदवेल फाट्याजवळील जंगल शिवारात रस्त्याच्या कडेला बुधवारी (दि. ५) सकाळी सात वाजता आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती नांदवेल गावचे पोलिस पाटील अनिल वाघ यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुकेश तायडे हे पशुवैद्यकीय व्यवसाय करत असून मुक्ताईनगर तालुक्यात विविध ठिकाणी सेवा देत होते. नांदवेल गावापासून अवघ्या पाचशे मीटर अंतराच्या आत रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत मुक्ताईनगर पोलीस अधिक तपास करत असून अपघातासह अन्य शक्यतांचाही तपास केला जात आहे. या घटनेमुळे मानपूरसह परिसरात शोककळा पसरली आहे.



