मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत पलटवार केला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करताना पवार म्हणाले की, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती. मात्र त्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी नव्हते. “मग त्या चर्चेबाबत बोलण्याचा त्यांना काय अधिकार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भारत–अमेरिका नव्या व्यापार करारावरही चिंता व्यक्त केली. या कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. विशेषतः अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची मुभा मिळाल्यास त्याचा देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना पवार म्हणाले की, संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो. मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळे यावेळी दिल्लीला जाता आले नाही. थेट सभागृहात उपस्थित राहून अर्थसंकल्प ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार काही बाबी समाधानकारक वाटतात. सामान्य नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकलेला नाही, ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, अर्थसंकल्पातून विकासाला गती देणाऱ्या अधिक ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, असेही पवार यांनी सांगितले. केवळ कर न वाढवणे किंवा सवलती देणे यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेला चालना देणारे निर्णय अपेक्षित होते. विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक असलेले काही महत्त्वाचे निर्णय अर्थसंकल्पात दिसून आले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
भारत–अमेरिका व्यापार कराराबाबत पुढे बोलताना पवार यांनी सांगितले की, अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या वस्तूंवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे जरी सांगितले जात असले, तरी त्याचबरोबर अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. अमेरिका आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देश असल्याने त्यांच्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश झाल्यास स्थानिक उत्पादक आणि शेतकऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.



