मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अशातच त्यांच्या अंत्यसंस्कारांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नसल्याचे त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केले आहे.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व आवश्यक धार्मिक विधी पूर्ण करण्यात आले आहेत. त्यामुळे यानंतर कोणताही स्वतंत्र दशक्रिया, दहावा किंवा तेरावा विधी पार पाडला जाणार नाही. विशेष म्हणजे, अजित पवार यांचा दशक्रिया विधी ६ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची चर्चा होती. मात्र, अस्थि विसर्जनावेळीच परंपरेनुसार सर्व विधी पार पाडण्यात आल्याने पुढील कोणताही धार्मिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नसल्याचे श्रीनिवास पवार यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. नुकतेच सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार यांच्याकडेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी पक्षातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पुढे येत आहे. मात्र, या संदर्भात प्रफुल्ल पटेल यांची निवड झाल्याच्या चर्चांना त्यांनी स्वतः फेटाळून लावले असून, सध्या पक्षात नेतृत्वाबाबत अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे अजित पवार यांच्या निधनाने राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असताना, दुसरीकडे पुढील नेतृत्वाबाबतच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.



