नंदुरबार : वृत्तसंस्था
नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पोलिस चौकीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या बसला मागून भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने बस समोर उभ्या असलेल्या ट्रक आणि कंटेनरच्या मधोमध अक्षरशः चिरडली गेली. या भीषण अपघातात बसचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला. अपघात इतका जबरदस्त होता की कंटेनरच्या धडकेत बसची केबिन चेंदामेंदा झाली. ट्रकचा अँगल थेट बसमध्ये घुसल्याने बसचे लोखंडी भाग वाकडे-तिडके झाले असून घटनास्थळावरील दृश्य अंगावर काटा आणणारे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात नवापूर आगाराची बस क्रमांक एमएच १४ एमएच १९५७ चे चालक महेंद्र लाजा गावित (रा. जामनपाडा, ता. नवापूर) यांच्या केबिनमध्ये पाय अडकले होते. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मोठ्या प्रयत्नाने त्यांना बाहेर काढले. बस वाहक संतोष बारसू सोंडे (रा. टाकळी, ता. भुसावळ) यांना पाय व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जामनपाडा येथील सरपंच प्रियंका जयवंत गावित यांचे बंधू मनोहर गावित यांनी स्वतःच्या खासगी वाहनातून जखमींना तातडीने विसरवाडी रुग्णालयात दाखल करून माणुसकीचा आदर्श घडवला.
या बसमध्ये एकूण १५ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये नवापूर तालुका, चिंचपाडा, नवापूर शहर, साक्री तालुका तसेच सुरत व दहिवेल येथील प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बहुतांश प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णतः विस्कळीत झाली होती. घटनेचा पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत.
अपघातात जखमी प्रवाशांची नावे –
- बस चालक महेंद्र लांजा गावित, राहणार जामनपाडा तालुका नवापूर
- बस वाहक संतोष बारसू सोंडे, राहणार भुसावळ
- योगेश माका पाटील, 28 वय, राहणार सुरत
- भावना योगेश पाटील, वय 22, राहणार सुरत
- भास्कर हरी चित्ते, वय 64, राहणार नवापुर
- वसंत आनंद वाणी, वय 55 राहणार चिंचपाडा तालुका नवापूर
- राजेश विनायक पाटील, वय 45, राहणार साक्री जि. धुळे
- उषा मोहन गायकवाड, वय 35, राहणार विसरवाडी ता. नवापूर



