अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील कसाली मोहल्ल्यात ३० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे स्वरूप गंभीर असल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तत्परतेने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आले.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेवकांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. फिरोज पठाण, नासीर हाजी, नवीद शेख, नाना धनगर, गुलाम नबी, इमरान शेख, अरमान हलवाई, वसीम पठाण, तय्यब पठाण, रिजवान मनियार, नईम पठाण, छोटू भोई व सुपडू मणियार यांनी घटनास्थळी घाव घेत अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्नीशमन दलाचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून देणे तसेच आग पसरू नये यासाठी नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे काम करण्यात आले. दरम्यान, अरुंद रस्ते व धुराचे लोट अशा प्रतिकूल परिस्थितीतही अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर पाण्याचा मारा केला. नागरिक व लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे आग आसपासच्या घरांपर्यंत पसरण्यापूर्वीच आटोक्यात आली. या घटनेत मोठी जीवितहानी टळली असली तरी नुकसान झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.



