जळगाव : प्रतिनिधी
नाशिराबाद येथील मुंजोबा मंदिर परिसरात आज भीषण अपघात घडला. एमएच २८ व्ही ६१५१ क्रमांकाच्या स्कॉर्पिओला जीजे३६ ३३४२ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने स्कॉर्पिओ पलटी झाली. या अपघातात स्कॉर्पिओमधील पार्थ गावंडे (वय १७) हा अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमधील कुटुंब हे तेल्हारा येथील असून ते देवदर्शनासाठी अमळनेर येथे गेले होते. वाहनात लहान मुले व महिलाही असल्याने अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक ट्रक जागीच सोडून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अपघातानंतर स्कॉर्पिओमधील कुटुंब अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होते. नातेवाईक येईपर्यंत त्यांची कोणतीही सोय नसल्याने नशिराबाद येथील नगरसेवक प्रदीप बोढरे यांनी माणुसकीचे दर्शन घडवत या कुटुंबाला आपल्या निवासस्थानी आश्रय दिला.
त्यांनी कुटुंबाला धीर देत सर्व आवश्यक व्यवस्था स्वतःच्या घरी करून दिली. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे परिसरातून कौतुक होत आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. या प्रकरणी पुढील कार्यवाही नशिराबाद पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत



