भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वराडसीम शिवारात २३ जानेवारी रोजी विजेच्या खांबावर अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्नात दहा वर्षीय मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बिसन बारेला (१०) असे या मृत मुलाचे नाव आहे. २३ रोजी नितीन हा वराडसीम शिवारात पतंग उडवत होता. दरम्यान, त्याची पतंग विजेच्या खांबावर अडकली. ती काढण्यासाठी तो खांबावर चढला. त्याचवेळी त्याला विद्युत तारांचा जोरदार धक्का बसला. या अपघातात नितीन गंभीररीत्या भाजला गेला. घटनेनंतर त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या दिवसापासून नितीनची मृत्यूशी झुंज सुरू होती. उपचार सुरू असतानाच २९ जानेवारी रोजी त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



