जळगाव : प्रतिनिधी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शुक्रवारी सकाळी अनियंत्रित ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांचा भाजीपाला उतरवून ट्रॅक्टर (क्र. एमएच १९ बीजी ८४१६) भाजीपाला मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडत होते. बाजार समितीतून बाहेर आल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर अचानक रस्त्यावरच पलटी झाले.
घटनेच्या वेळी सकाळची गर्दी असल्याने बाजार समिती परिसरात मोठी वर्दळ होती. ट्रॅक्टर पलटी होताच मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. मात्र, या अपघातात चालकासह इतर कोणालाही दुखापत न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
दरम्यान, महामार्गाच्या मध्यभागी ट्रॅक्टर आडवे पडल्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या मदतीने काही वेळातच ट्रॅक्टर बाजूला करण्यात आले, त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.



