नालासोपारा : वृत्तसंस्था
सोशल मीडियावर राजकीय नेत्यांबद्दल आक्षेपार्ह, अपमानास्पद आणि अश्लील भाषा वापरणे एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची खळबळजनक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरून पोस्ट करणाऱ्या तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेतील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्येही तीव्र चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूरज महेंद्र शिर्के असे संबंधित तरुणाचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट करत होता. विशेषतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्याबद्दल त्याने अत्यंत अवमानकारक शब्द वापरल्याचा आरोप आहे. या पोस्टमध्ये एका नेत्याला समर्थन देत इतर नेत्यांवर गंभीर आरोपही करण्यात आले होते.
या पोस्ट सोशल मीडियावर वेगाने पसरल्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली. ठाकरे कुटुंबीयांबद्दल वापरलेली भाषा अत्यंत अश्लील व अपमानास्पद असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, मनसेचे उपविभाग अध्यक्ष किरण नकाशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना संबंधित तरुण नालासोपारा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मनसे व शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत तरुणाला पकडले. कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप असून, त्यानंतर अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावरून सुमारे दीड किलोमीटरपर्यंत त्याची धिंड काढण्यात आल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.
या घटनेमुळे नालासोपारा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रस्त्यावर जमलेल्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी या प्रकाराला कायद्याच्या चौकटीबाहेरील कारवाई असल्याचे म्हटले, तर काहींनी सोशल मीडियावर मर्यादा ओलांडणाऱ्या पोस्टविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती असून, सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि रस्त्यावर घडलेल्या हिंसक घटनेबाबत कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



