जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डाणपुलावर रूग्णवाहिका आणि रिक्षाची समोरासमोर जोरदार टक्कर होवून अपघात झाल्याची घटना गुरूवार १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तीन जण जखमी झाले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोरील उड्डापुलावर गुरूवार १४ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास (एमएच १४ सीएल ०७५५) या क्रमांकाची शासकीय रूग्णवाहिका आणि एमएच १९ सीडब्ल्यू ०६३८ क्रमांकाच्या ऍपे रिक्षाची समोरा समोर धडक झाली. या अपघातात रूग्ण वाहिकाचालक निलेश धनगर रा. वरणगाव ता. भुसावळ यांच्यासह रिक्षातील दोन जण जखमी झाले असून यातील एकाच प्रकृती गंभीर आहे. जखमींचे नावे अद्याप मिळालेले नाही. ही धडक इतकी भयंकर होती की रूग्णवाहिका आणि रिक्षा दोन्ही उलटल्या. तर रिक्षाचा यात अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील सहकार्यांनी धाव घेऊन जखमींवर उपचार केले. या अपघातामुळे राष्ट्रीय महामागार्वरवर ३० मिनीटे वाहतूक खोळंबली होती. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.