जळगाव : प्रतिनिधी
भरधाव मालवाहू वाहनाने धडक दिल्यामुळे वाहनाच्या पुढील बाजूस अडकलेल्या पादचाऱ्यास निर्दयीपणे फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही अंतरावर दोन जणांनी पादचाऱ्यास रस्त्याच्या बाजूला ठेवून पळ काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले आहे. या प्रकरणी वाहनचालक व अन्य एकाविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांचननगरमधील रहिवासी श्यामराव राजाराम कापसे (७९) हे दाणाबाजार परिसरात काम करायचे. ११ जानेवारी रोजी ते मृतावस्थेत आढळले होते. या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता श्यामराव कापसे यांना एका मालवाहू वाहनाने धडक दिल्याचे आढळले. धडक दिल्यानंतर ते वाहनाच्या पुढील बाजूस अडकले असता त्यांना सुभाष चौकापासून दाणाबाजारातून कोपऱ्यावरील एका ऑप्टीकल दुकानापर्यंत फरफटत आणले. त्यानंतर वाहनचालक व त्याच्यासोबत असणारा एक जण, अशा दोन जणांनी वृद्धास रस्त्याच्या बाजूला टाकून ते पसार झाले. याप्रकरणी मयताचा मुलगा प्रशांत कापसे यांनी फिर्याद दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना कैद झाल्याने हा प्रकार समोर आला. मात्र फुटेजमध्ये वाहनाचा क्रमांक व चालकासह त्याच्यासोबतच्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटविताना पोलिसांना अडचण येत आहे.



