राज्यभरातही शिंदे गटाच्या भूमिकेची उत्सुकता
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वतंत्र चूल मांडण्याची भूमिका तालुक्यातील माजी पालकमंत्री व आमदार गुलाबराव पाटील समर्थकांनी घेतली आहे . यासाठी पुढाकार घेऊन हे समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून आले आहेत . या शिंदे गटाचे नेतृत्व आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडेच राहणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत . तथापि शिवसेनेपासून वेगळे होऊन आपल्याच तालुक्यात स्वतंत्र लढणे ही गुलाबराव पाटील यांचीच कसोटी ठरणार आहे .
राज्यातील सत्तांतराचा पार्शवभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री शिंदे समर्थक काय भूमिका घेतील याची उत्सुकता सर्वांना आहेच . त्यात राज्यात पहिल्यांदा धरणगाव नगरपरिषदेसाठी अशी भूमिका घेतली गेल्याने आता अन्य शहरांमध्ये काय चित्र तयार होईल किंवा सामान्य शिवसैनिकांमध्ये काय संदेश जाईल ? , असे प्रश्न विचारले जाणार आहेत . स्थानिक राजकारणात अशा घडामोडी घडून मुख्यमंत्री शिंदे यांचा गट शिवसेनेपासून दूर जात राहावा आणि त्याच्यात मनोमिलनाच्या सगळ्या शक्यता निघून जाव्यात, या भाजपच्या मानसुब्यांना बळच मिळू शकणार आहे . त्यासाठी भाजपाही आपली ताकद शिंदे गटाच्या पाठीशी उभी करू शकणार आहे . शिवसेनेचे निमशहरी आणि ग्रामीण भागातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी अशा घटना घडाव्यात हे भाजपाला पाहिजेच आहे . त्यासाठी खास करून सत्तेच्या वर्तुळातील हितसंबंध सांभाळत आपल्याही पदरात काही पडावे अशी संधी शोधणारे शिवसेनेचे चाणाक्ष कार्यकर्ते शोधून त्यांना शिंदे गटाच्या गळाला लावणे यासाठी शिंदे गटाला भाजप मदत करू शकतो अशी चर्चा आताच सुरु झाली आहे .
नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकीत राज्यात सर्वत्र असेच चित्र तयार झाले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची वाट कठीण झालेली भाजपला पाहिजेच आहे .
या सगळ्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात शिवसेनेच्या खुल्या प्रचाराला आमदार गुलाबराव पाटील जाऊ शकणार नाहीत हे स्पष्टच आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवर भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन जिल्ह्यात गुलाबराव पाटील आणि शिंदे गटाला फायदा व्हावा म्हणून काय जबाबदारी घेतात आणि ते ती कशी पूर्ण करतात हा मुद्दाही महत्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे प्रामुख्याने या डावपेचांमधील शह – काटशहाच्या राजकारणात कोणते आणि कसे प्रतिडाव टाकतात हा मुद्दाही अत्यंत जोखमीचा तितकाच राज्यभरात लक्षवेधी ठरणार आहे .
धरणगावातील आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह त्यांचे समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले तेंव्हा या पद्धतीने पुढे जाण्यास मुख्यमंत्री शिंदे यांनीही हिरवा कंदील दाखवला आहे . नगरविकास खाते आणि राज्यातील सत्ता आपली आपली आहे काहीच काळजी करू नका .धरणगावच्या विकासासाठी मी काहीही कमी पडू देणार नाही , अशी हिम्मत या चर्चेत मुख्यमंत्र्यांनी या समर्थकांना दिली आहे .
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेसाठी गेलेल्या आमदार गुलाबराव पाटील समर्थकांमध्ये धरणगाव शहरप्रमुख राजेंद्र महाजन , गटनेते विनय पप्पू भावे , विलास महाजन , विजय महाजन, मोतीअप्पा , अभिजिती पाटील, भैय्या महाजन, रवींद्र कंखरे , प्रशांत देशमुख आदीचा समावेश होता .