पाचोरा : प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर पाचोरा तहसील कार्यालयात जप्त करीत असताना वाळू माफियांनी पाचोरा तलाठ्यास मारहाण करीत ट्रॅक्टर पकडल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यावरून पाचोरा पोलिसांत तिघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी गंगाधर अण्णाराव सुरनर (२५, पाचोरा) यांच्याकडे अवैध गौण खनिज विरोधी कारवाईसाठी नेमणूक केली असता मंगळवारी सकाळी १० वाजेचे सुमारास अंतुर्ली रोडकडे अवैध वाळूचे भरलेले विनानंबरचे ट्रॅक्टर जाताना दिसले. तात्काळ तलाठी सुरनर यांनी त्यास हटकले असता ओळख पत्र दाखवून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात घेऊन चल म्हणून चालकास सांगितले. मात्र जप्त केलेले ट्रॅक्टर एका सहकारी तलाठ्यांच्या मदतीने घेऊन येत असताना ट्रॅक्टरसमोर दुचाकी (एमएच१९/डिके०६३७) आडवी करून अडथळा निर्माण केला आणि त्यांनी तलाठ्यावर हल्ला करून जोरदार मारहाण केली.
यावेळी आणखी एक दुचाकीवर आला. यापूर्वी असलेले दोघे आणि दुचाकीवरील एकजण अशा तिघांनी तलाठी सुरनर यांना जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून मारहाण केली. यावेळी वाळू चोरट्याने तलाठ्यांचा मोबाईल दूरवर फेकून दिला. यातील आशिष उर्फ लड्डू चव्हाण (पुनगाव, ता. पाचोरा), चालक व एक अज्ञात अशा तिघाविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पाचोरा पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, तलाठ्यावरच हल्ला करण्यात आल्याने वाळूमाफिया किती मुजोर झाले आहेत, हेच यामुळे दिसून येते.



