पिके उद्ध्वस्त, आदेश तत्काळ ; प्रतापराव पाटील प्रशासनाच्या रिंगणात
धरणगाव तालुक्यात मंगळवार, दिनांक 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस व जोरदार वादळाने हजेरी लावली. या अवकाळी पावसासोबत आलेल्या वादळामुळे तालुक्यातील हजारो हेक्टरवरील मका, ज्वारी व गहू पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके पूर्णतः आडवी पडल्याने शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल ठरली आहे.
अनेक शेतांमध्ये वादळाच्या तीव्रतेमुळे पिके जमीनदोस्त झाली असून काढणीच्या तोंडावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचानक ओढवलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून पुढील आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.
या घटनेची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांना दिली. याची तातडीने दखल घेत प्रतापराव पाटील यांनी धरणगाव तहसीलदारांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागात लवकरात लवकर पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. शासनाने तातडीने मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.



